OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
  शरीर चिंतन

  शरीर चिंतन

  आपलं मानवी शरीर हे एक अजब यंत्र आहे, तुम्ही त्याला जशा सवयी लावाल तसं ते लावून घेतं, तुम्ही सांगाल ते काम करतं, रात्री उशिरापर्यंत जागवलं तरी जागत, रात्रपाळी करायला लावली तर करतं, खूप व्यायाम करायला लावला तरी करतं पण हे कुठपर्यंत ? त्यालाही काही मर्यादा आहेत. आपलं शरीर उत्तम स्वास्थ्यपूर्ण ठेवायचं असेल, दीर्घकाळ टिकवायचं असेल तर त्याची आपणच काळजी घ्यायला नको का ?
  आपण दिवसभरात किती वेळा आपल्या आरोग्याचा विचार करतो याविषयी शांतपणे बसून आठवलं तर लक्षात येईल की आपण आपल्या स्वतःच्याच शरीराकडे किती दुर्लक्ष करतो.
  आयुर्वेद हे आरोग्य विषयक शास्त्र असल्यामुळे आरोग्य टिकवणं हा त्याचा मूळ उद्देश आहे आणि ते टिकवण्यासाठी काय काय करायला हवे याचे मार्गदर्शन तो आधी करतो आणि मग जर आजार झाला तर काय करायचे याची माहिती देतो. दीर्घकाळ आणि निरोगी असे जीवन हवे असेल तर दिवसभर आपण काय करावे हे दिनचर्येत सांगितले गेले आहे. यात आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करणे अपेक्षित आहे त्याचे वर्णन आहे. हे सांगताना दुसरीच ओळ अशी सांगितली आहे की सकाळी जाग आली की थाडकन उठून लगेच कामाला लागू नये तर थोडा वेळ बिछान्यात बसून जरा शरीर चिंता करावी. शरीर चिंता म्हणजे काळजी नाही तर चिंतन !! कशाचे चिंतन ? कशासाठी करायचे ?
  आजची आपली धकाधकीची जीवनशैली पाहता हा सल्ला खूपच महत्वाचा वाटतो. आपल्या तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी नेहमीच चालू असतात कारण आपण शरीराकडून अवास्तव अपेक्षा करतो आणि त्याचा कसाही वापर करतो. वेळेवर जेवत नाही, झोपत नाही, व्यायाम करत नाही, पुरेशी विश्रांती घेत नाही, मनावर खूप ताण तणाव ठेवतो. त्यामुळे मग अनेक तक्रारी सुरु होतात. जसे, छातीत वारंवार जळजळ होणे, भूक न लागणे, मळमळ होणे, नेहमी तोंड येणे, पोट साफ न होणे, gases होणे, करपट ढेकर येणे, झोप नीट न लागणे, चिडचिड होणे, उत्साह न वाटणे या आणि अशा अनेक. जो पर्यंत या त्रासामुळे आपले काम अडत नाही तोपर्यंत आपण त्याकडे खुशाल दुर्लक्षच करतो आणि या सवयीमुळेच कधीतरी मोठी आरोग्यविषयक समस्या आ वासून समोर उभी राहते.
  शरीर चिंतन म्हणजे याच अनेक बाबींविषयी आपण विचार करणे अपेक्षित आहे.
  आपल्याला कोणताही त्रास किंवा तक्रार सारखी सारखी जाणवतीय का ? असेल तर ती किती तीव्रतेची आहे ? आपल्या सवयींमुळे हा त्रास आपल्याला होतोय आणि त्यासाठी थोडा विचार करून सवयी सुधारायला हव्यात की कोणा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला किंवा औषधोपचार यांची गरज आहे ? यासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून पाच मिनिटे काढली तर ती आपल्याच फायद्याची ठरतील कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे “One stitch saves nine ” या प्रमाणे पुढे खरंच एखादा गंभीर आजार होण्याची पूर्व सूचना या छोट्या तक्रारी द्वारे शरीर आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष पुरवल्यामुळे होणारी हानी आपण नक्की टाळू शकतो.
  असे कितीतरी हृदयविकाराचे रुग्ण आम्ही पाहिले आहेत की त्यांना खरा त्रास हृदयाचा होत होता, शरीर तशी सूचना देण्याचा प्रयत्न करत होते पण केवळ दुर्लक्ष केल्याने एकदम attack आला किंवा जीव गमवावा लागला. एका ठराविक मर्यादेपलीकडे कोणीच दुसऱ्याची काळजी घेऊ शकत नाही, करू शकत नाही, ती आपली आपल्यालाच घ्यावी लागते, त्यामुळे आहार, व्यायाम आणि आपले काम यात समतोल साधत आपले स्वास्थ्य जपण्याचा आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. शरीराबरोबरच मनाचाही विचार व्हायला हवा. मन तणावमुक्त, आनंदी कसे राहील, त्यासाठी काय करता येईल हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. कोणाला छान चित्र काढून आनंद मिळेल तर कोणाला गाणं म्हणून, वाद्य वाजवून, आपला छंद जोपासून !! तेव्हा आता उशीर न करता उद्यापासूनच शरीर चिंतन करायला सुरुवात करूया, निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करूया कारण “शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनं ” असे म्हटलेलेच आहे.