OK
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Store Timings
  उपाशीपोटी बाहेर पडणे

  उपाशीपोटी बाहेर पडणे

  आम्ही रोजच अनेक पेशंट्सशी बोलत असतो, त्यांच्या आजाराची प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांचे खाणे, पिणे, सवयी यांचा इतिहास फार महत्वाचा असतो.कारण आरोग्य आणि आजार दोन्हीमध्ये आहार हा घटक खूप महत्वाचा आहे. गेल्या साधारण ८ /१० वर्षांमध्ये आहाराची संकल्पना फार झपाट्याने बदलली आहे. म्हणजे continental food, बेकरीचे पदार्थ, हॉटेलिंग या गोष्टी खूप सहज आपल्या आहारात समाविष्ट झाल्या. tinned food, canned food, processed food हे अगदी रोज वापरात येऊ लागलं, preservatives, फ्रीज यांचा अन्न टिकवण्यासाठी वापर वाढला. एकीकडे अन्नधान्य, भाजीपाला, फळे पिकवताना कीटकनाशक फवारे, खते यांचाही वापर खूपच जास्त झाला. या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतोच आहे. अम्लपित्तापासून अनेक प्रकारच्या तक्रारी अनेक जणांना नियमित जाणवत असतात. त्वचारोग त्रास देतात आणि इतर काही गंभीर आजार होण्याची शक्यताही बळावते पण गेल्या काही वर्षात सगळ्या वयोगटात मला भेडसावणारी एक प्रमुख समस्या आहे ती म्हणजे उपाशी राहण्याची !!
  म्हणजे अगदी शाळेत जाणारी लहान मुले देखील उठून, आवरून तशीच शाळेत निघून जातात, काहीही न खाता पिता !!दूध याविषयी तर परत कधीतरी लिहीन. “आमचा मुलगा दूध पीतच नाही हो, त्याला नं वासच आवडत नाही, चवच आवडत नाही ” असं पालकच कौतुकानं सांगतात तर काय करणार ? दूध पचत नाही, दुधाने मळमळ होते, पोट फुगते अशा अनेक तक्रारी आईबाबा सांगतात. दुसरं काही खायला द्यावं तर ही मुलं सकाळी इतकी लवकर घराबाहेर पडतात की उठल्यानंतर भुकेची जाणीव होईपर्यंत शाळेत पोचलेली असतात. याचा परिणाम असा होतो की रात्री कधीतरी सात आठ वाजता ही मुलं एकदा जेवली की साधारण बारा तेरा तासांनी शाळेत breakfast ची सुट्टी होईपर्यंत उपाशीच राहतात. बरेचदा अगदी छोटी मुलं, म्हणजे साधारण बालवाडीत जाणारी, अचानक सकाळी रडरड करतात, काहीच ऐकत नाहीत तेव्हा त्यांना भूक लागलेली असते. कधी कधी ही मुलं रात्रीही नीट जेवण करत नाहीत आणि सकाळी तशीच शाळेत जातात मग चिडचिड, मारामारी देखील करतात पण आईबाबा किंवा टीचर यांच्या हे लक्षातच येत नाही आणि बिचारी मुलं विनाकारण बोलणी खातात. सगळ्यात घातक परिणाम म्हणजे उपाशीपोटी कोणत्याही स्वरुपाची infections, संसर्ग मुलांना पट्कन होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात. सर्दी, ताप, खोकला असं सतत सुरु असत, त्यामुळे शालेय वयातील कोणतीही मुलं उपाशी जाणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला हवी.
  कॉलेजला जाणारी बहुसंख्य मुलं fashion म्हणून डबा नेत नाहीत, त्यांना लाज वाटते. मग दोन पर्याय उपलब्ध असतात, एक तर बाहेरचं खायचं किंवा उपाशी राहायचं !!दोन्हीही तेवढेच घातक आहेत. जे मजा म्हणून, चैन म्हणून किंवा परवडतं म्हणून बाहेर खातात त्यांना इतर त्रास सुरु होतात. कमी वयात acidity, डोकेदुखी, मलबद्धता अशा तक्रारी निर्माण होतात. नोकरी करणारे लोकं ही जर उपाशीपोटी गेले तर असे त्रास होतातच शिवाय कामात लक्ष न लागणे, चिडचिड आणि वाद निर्माण होणे असं होऊ शकतं. यांचा संबंध भुकेशी किंवा उपाशी राहण्याशी असू शकतो असं आपल्याला दुरान्वयानेही वाटत नाही पण तो तसा निश्चितपणे असतो. त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडताना खाऊनच जाईल हे पाहणे ही गृहिणीची मोठी जबाबदारीच आहे.
  खूप पोटभर जरी खाल्लं नाही तरी निदान हलका नाश्ता तरी केलेला असेल, सुट्टीत खाण्यासाठी व्यवस्थित डबा घेतलेला असेल हे आवर्जून बघायलाच हवं. शेवटी संपूर्ण घरादाराचे आरोग्य तिच्याच तर हातात असते. पण हे सगळं करताना आपण स्वतःदेखील आठवणीने खायला हवे, उपाशी राहू नये तरच आपलेही आरोग्य टिकेल हे ध्यानात ठेवावे.